औरंगाबाद: मतदानाच्या दिवशी अफवांचा बाजार पसरविण्यात सोशल मीडियाने जराही कसर सोडली नाही. फेक व्हिडिओ आणि मेसेजने दिवसभर शहराचे वातावरण तापतेच ठेवले होते. सोशल मीडियावरील या रिकामटेकड्या किड्यांनी पोलीस तसेच प्रशासनाची मात्र नाहक डोकेदुखी वाढवल्याचे दिसले.
निवडणूक आयोगाच्या कठोर आचारसंहितेमुळे निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार रोखले गेले. त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनाही कायद्याच्या कचाट्यात बांधण्यात आयोगाला यश आले आहे. मात्र सोशल मीडियावर अटकाव घालता आला नाही, हेही खरे. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या आणि व्हिडिओ पसरविण्यात आले. या मेसेज आणि व्हिडिओचा मोठा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागला. मतदान केंद्रात फोटो काढण्याला बंदी असताना एका बहाद्दराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे छायाचित्र असलेली पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खरेतर मतदान केंद्रात फोटो काढण्याला बंदी आहे अनेक ठिकाणी मोबाइलही मोबाइलही सोबत नेता येत नव्हता. अशावेळी या महाशयाने ईव्हीएम मशीन वरील बोटाचे छायाचित्र टिपले अन सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. अशी असंख्य छायाचित्रे दिवसभर व्हायरल होत होती. एका बहाद्दराने तर ॲप वर खोटा व्हिडिओ बनवून चांगलाच धुमाकूळ घातला. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडणारे असंख्य मेसेज दिवसभर व्हायरल होत राहिल्याने सोशल मीडियावर प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसून आले.